जालना : एआयएमआयएम चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीका करण्यात येत आहे. वारीस पठाण हा वारीस नसून लावारीस आहे. तो भेटल्यावर त्याच्या कानशिलात लगावणार असल्याचा इशारा शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे वारिस पठाण यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण म्हणाले होते की, सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात अनेक आंदोलने केली जात आहेत. 'आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे आहे. पण ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यावे लागत असते. आता फक्त वाघिणी म्हणजे मुस्लीम महिला पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला आहे. जर आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण 15 कोटी आहेत. पण या 100 कोटींना भारी पडू असे धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान त्यांनी केले होते. पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याने त्यांच्यावर सगळीकडून टीकेचा भडिमार सुरूच आहे. आता वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. वारिस पठाण भेटल्यावर त्याच्या कानशिलात लगावणार तसंच वारिस हा वारिस नसून तो तर लावारिस असल्याचा टोला देखील खोतकर यांनी लगावला आहे.